सोलापूर – चुलत भावाच्या घरात चोरी करून दागिने विकण्यास जाताना शहर गुन्हे शाखेने अनिल शंकर गोलेकर (वय ३३, रा. सोनी नगर, मोदी हुडको) यास अटक केली असून त्याच्याकडून सुमारे पाच लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
फिर्यादी श्रीकांत बाबू गोलेकर (वय ३०, रा. सोनी नगर) यांचा चुलत भाऊ अनिल याच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने तक्रारदार व इतर नातेवाईक त्याच्या घरी ये-जा करीत होते. या कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांच्या घरातून अनिल याच्या घरात ये-जा करीत होते. त्यामुळे श्रीकांत व कुटुंबीयांनी त्यांच्या घरास कुलूप न लावता, घर उघडे ठेवले होते. या कार्यक्रमा दरम्यान २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री १०:३० दरम्यान अज्ञात चोरट्याने श्रीकांत यांच्या घरात प्रवेश करून बेडखाली ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेले सोने व चांदीचे दागिने चोरून नेले होते.
या घटनेबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला होता. त्यावेळी शहर गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली होती. गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पध्दतीवरून ही चोरी जवळच्या कोणीतरी व्यक्तीने केली असल्याबाबत दाट संशय होता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे अत्यंत कठीण झाले होते. परंतु पथकाने गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून, गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळविली. तसेच त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे अत्यंत कौशल्याने विश्लेषण केले. या सर्व माहितीवरून गुन्हा करणारा फिर्यादी श्रीकांत गोलेकर याचा चुलत भाऊ अनिल गोलेकर हा असल्याची खात्री केली.
त्यानंतर त्यास पथकाने सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुद्देमालासह मोदी स्मशानभूमीजवळून ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत त्याने फिर्यादीच्या घरातून चोरलेले ८५.७ ग्रॅमचे सोन्याचे व १८४.५ ग्रॅमचे चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ९२ हजार ५२० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे, प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.