जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. इस्राईलने दक्षिण गाझा खाली करण्यास सांगितले असून आता दक्षिण गाझामध्ये इस्रायलचे हल्ले तीव्र झाले आहेत. हमाससोबत युद्धविराम संपल्यानंतर इस्रायली सैन्याने जमिनीवरील कारवाया तीव्र केल्या आहेत, ज्यांचे गंतव्यस्थान आता दक्षिण गाझा आहे. इस्रायली सैन्याने सांगितले आहे की, त्यांची कारवाई उत्तर गाझामध्ये केलेल्या कारवाया एवढीच तीव्र असेल. दक्षिणेतील खान युनूस आणि रफाह येथे इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. उत्तर गाझा येथील जबलिया शरणार्थी शिबिरावर हल्ले झाले आहेत.
या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा बळी जाऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील आठवडाभर चाललेला युद्धविराम करार हमासने महिला ओलीस सोडण्यास नकार दिल्याने खंडित झाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या हिंसाचाराबद्दल जाहीरपणे काहीही बोलू नये अशी हमासची इच्छा होती. तर हमासने हे आरोप फेटाळून लावले असून ते पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. युद्धातील इस्रायलचा मित्रराष्ट्र असलेल्या अमेरिकेनेही इस्रायलच्या लष्कराला नागरिकांची जीवितहानी कमी करण्याचा इशारा दिला आहे. गाझाच्या दक्षिणेकडे लष्कराची कारवाई सुरू असताना इस्रायलने नागरिकांबाबत सावध राहावे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
इस्रायल संरक्षण दलाचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, आम्ही हमासचा उत्तर गाझामध्ये पाठलाग केला आणि आता आम्ही त्यांचा दक्षिण गाझामध्ये पाठलाग करत आहोत. हमासविरोधात आम्ही जास्तीत जास्त शक्ती वापरणार आहोत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी तेल अवीव येथील संरक्षण मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीला पंतप्रधानांसह आयडीएफ चीफ ऑफ स्टाफ, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रमुख, मोसादचे प्रमुख, शिन बेटचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री योव गॅलांट हे देखील उपस्थित होते.
अजूनही १३७ जण ओलीस
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला, त्यादरम्यान हमासने २५० हुन अधिक जणांना बंदी बनवले होते. करारानुसार काही ओलीसांची सुटा करण्यात आली आहे. आताही हमास जवळपास १३७ लोकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायली प्रवक्त्याने ओलिसांची सुटका करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेकडे मदत मागितली आहे.
१६ हजार लोकांचा मृत्यू
युद्धबंदीनंतर इस्रायलने गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी रात्री इस्रायलच्या हल्ल्यात ७०० पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला. हमास-प्रशासित पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गाझामध्ये आतापर्यंत सुमारे १६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.