मुंबई : लाल मिरची गेल्या महिन्यात महागली होती. किंमत अजून वाढण्याची शक्यता होती. पण मिरचीने ग्राहकांना, विशेषत: गृहिणींना सुखद धक्का दिला. वर्षभराच्या तिखटासाठी त्यांना आता अधिक पैसे खर्च करण्याची गरज नाही. लाल मिरचीचे भाव घसरल्याने शेतकरी, व्यापारी यांना फटका बसला असला तरी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस महागाईने त्रस्त असणा-या गृहिणींना लाल मिरच्यांनी सध्या मसाल्यातील गोडवा वाढवला आहे. एक महिन्यापूर्वी लाल मिरची भाव खाऊन गेली. मिरची महागल्याने वर्षभराच्या तिखटासाठी खिशावर ताण येणार असा अंदाज लावण्यात येत होता. पण मिरचीने ग्राहकांना, विशेषत: गृहिणींना सुखद धक्का दिला. वर्षभराच्या तिखटासाठी त्यांना आता अधिक पैसे खर्च करण्याची गरज नाही.
आवक वाढल्याने भाव कोसळला
धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरच्यांची आवक वाढली आहे शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात यंदा मिरचीची लागवड झाल्याने आवक वाढल्याने मिरचीचे भाव पडले आहेत. मिरचीला दोन हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
आता अजून मिरचीची आवक वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे भाव अजून घसरण्याची शक्यता आहे. धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये चपाटा काश्मिरी गावराणी लाल मिरची विक्रीला येते. चपाटा काश्मिरी गावरान मिरचीची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने मिरचीला कमी दर मिळत आहे. शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे. गृहिणींनी जादा दर द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
संकेश्वरी गेली भाव खाऊन
एकीकडे चपाटा आणि इतर मिरच्यांचे भाव कोसळले असले तरी नांदेड जिल्ह्यातील संकेश्वरी मिरची भाव खाऊन गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज कृषि उत्पन्न बाजार समितीत या संकेश्वरी मिरचीचे आडत व्यापारी, पदाधिका-यांनी स्वागत केले. संकेश्वरी मिरचीला किलोमागे ८०० रुपये दर मिळाला आहे.
भाजीपाल्याला मातीमोल भाव
सोयाबीन, तूर, कापूस पाठोपाठ आता भाजीपाला देखील मातीमोल भावात विक्री करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला ५ रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी निराश झाला आहे. गाजर १४ रुपये किलो, तर पालक फक्त ६ रुपये किलोवर विक्री होत आहे. कोथिंबीर पंधरा रुपये किलोवर तर गोबीचे ८ रुपये किलोपर्यंत भाव घसरले..वाटाण्याची १६ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.