28.5 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeमहाराष्ट्रपवारांनी शिंदेंचा सन्मान करणे दुर्दैवी

पवारांनी शिंदेंचा सन्मान करणे दुर्दैवी

राऊतांचा हल्लाबोल!

मुंबई : प्रतिनिधी
मंगळवारी नवी दिल्लीमधील ‘महाराष्ट्र भवन’ सदनामध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार देऊन शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचे कौतुकही केले. मात्र या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावायला नको होती. शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणे दुर्दैवी आहे, असे मत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना कठोर शब्दांमध्ये संजय राऊतांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर शरद पवारांनी या कार्यक्रमात केलेल्या जाहीर भाषणामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मला आनंद आहे की, आज महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नुसते महाराष्ट्राचे नेतृत्व केले असे नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल? याप्रकारची काळजी त्यांनी घेतली, असे शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना शरद पवारांनी, ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या ५० वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील,’ असे शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना, एक योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रांतील लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषत: नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचे काम त्यांनी केले, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून.. आनंद आहे, असेही शरद पवारांनी म्हटले.

शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्यावरून बोलताना संजय राऊतांनी, ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणे ही योग्य गोष्ट नाही, असे म्हटले. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे, असेही राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR