नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगातील सर्वात भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जगातील तब्बल दोन तृतीयांश देशांत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. या क्रमवारीत भारताचे स्थान ९६ क्रमांकावर आहे. भारताला ३८ गुण मिळाले आहेत.
भ्रष्ट देशांची क्रमवारी जाहीर : दरम्यान, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ ची क्रमवारी जारी केली आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात जगातील सर्वात भ्रष्ट आणि सर्वात इमानदार देशांची क्रमवारी जारी करण्यात येते. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीच्या आधारे सीपीआय १८० देशांची क्रमवारी सादर करते.
देशांना ० ते १०० या दरम्यान गुण दिले जातात. ज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा देश हा इमानदार देश असतो तर सर्वात कमी गुण मिळवणारा देश हा भ्रष्ट देश जाहीर केला जातो. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिनने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पाकिस्तानसहित भारताच्या काही देशांनी भ्रष्टाचारामध्ये आघाडी मिळवली आहे.
सीपीआय रिपोर्टनुसार, भ्रष्टाचाराचा स्तर हा चिंताजनक आहे. रिपोर्टमध्ये जगातील गंभीर भ्रष्टाचार समोर आले आहेत. दोन-तृतियांश देशांना ५० हून कमी गुण मिळाले आहेत. या देशांत जगातील ६.८ अब्ज लोक राहतात. जे जगाच्या लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत.
सुदान सर्वात भ्रष्ट देश : जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश आहे सूदान. या देशाला केवळ ८ गुण मिळाले आहेत. या यादीत १८० क्रमांक मिळालेला देश आहे. त्यानंतर सोमालिया १७९ क्रमांक, व्हेनेझुएला १७८ क्रमांक, सिरिया १७७ क्रमांकावर आहे.
अत्यंत कमी भ्रष्टाचारीे देश : सर्वात कमी ज्या देशात भ्रष्टाचार होतो अशा देशांमध्ये डेन्मार्कने सलग ७ व्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. सीपीआय प्रमाणे ९० गुण प्राप्त केले आहेत. दुस-या क्रमांकावर फिनलँड (८८) तिस-या कम्रांकावर सिंगापूर (८४) चौथ्या क्रमांकावर न्युझीलंड (८३), ८१ गुणांसहित लक्झेंबर्ग, नॉर्वे स्वित्झर्लंड संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहेत.
भारत ९६ व्या क्रमांकावर!
भारत या यादीत ९६ क्रमांकावर आहे. भारताला ३८ गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या यादीत भारत हा ९३ व्या क्रमांकावर होता. त्यामुळे ३ क्रमांकाने घसरण झाली आहे. आपल्या शेजारी देशांच्या यादीतील स्थानांचा विचार केल्यास पाकिस्तान २७ गुणांसहित थेट १३५ क्रमांकावर आहे. चीन ४२ गुणांसहित ७६ व्या क्रमांकावर आहे. बांगलादेश २३ गुणांसहित १५१ व्या स्थानावर आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान अनुक्रमे १२१ आणि १६५ व्या स्थानावर आहेत.