८२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उचलले पाऊल
परळी : प्रतिनिधी
परळी विधानसभा निवडणुकीत घडलेल्या गोंधळावर ८२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास फड आणि त्यांच्या मुलावर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंद करण्यात आला. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करीत माहिती दिली. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान परळी विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी ब-याच ठिकाणी गोंधळ झाल्याचे व्हीडीओ व्हायरल झाले होते. तसेच धमक्या आणि मारहाणीचे प्रकारही घडल्याचे समोर आले होते. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट व्हीडीओ सार्वजनिक करीत संंबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आवाहन केले होते. अखेर ८२ दिवसांनी याची गंभीर दखल घेऊन कैलास फड नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इतरांवरही गुन्हे दाखल केले असल्याचे ट्विट दमानिया यांनी केले.
मुंडे बोगस मतदानावर
आमदार झाले : देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच माधव जाधव यांना मारहाण झाली. त्यानंतर लगेचच माधव जाधव यांनी ऑनलाईन तक्रार केली. मात्र, पोलिसांनी जबाब घेतला नाही किंवा साधा उल्लेखही केला नाही, असा आरोप करतानाच एवढेच नव्हे तर धनंजय मुंडे हे बोगस मतदानावरच आमदार झाले आहेत, असा खळबळजनक दावा केला आहे.