मुंबई : प्रतिनिधी
दिल्लीत असूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेणार नसल्याचे सांगितले आहे. कोणी कोणाचे कौतुक करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ११ फेब्रुवारी रोजी दिल्लीत हा कार्यक्रम पार पडला. पण यामुळे आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण दिल्लीत असूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेणार नसल्याचे सांगितले आहे.
कोणी कोणाचे कौतुक करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्राशी गद्दारी करणा-यांचे आम्ही कौतुक करणार नाही, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. दिल्लीत असलेल्या आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते, आमदार यांनी गुरुवारी (ता. १३ फेब्रुवारी) दिल्लीतून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, काल बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आता ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकींमध्ये एक साम्य आहे. जे कोणी जिंकले आहे, त्यात निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे. निवडणूक आयोगाचे आभार मानताना भाजपाच्या वतीने आम्ही ही चर्चा करतोय, निवडणुकीत घोटाळा झाला आहे, ते जगासमोर आणणे गरजेचे आहे असे ठाकरेंनी सांगितले. परंतु, यावेळी त्यांना शरद पवारांची भेट घेणार का? असे विचारण्यात आले. तर त्यांनी थेटपणे ‘नाही’ असे उत्तर दिले.
यावेळी त्यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे जे कौतुक केले, त्याबाबत भाष्य करत म्हटले की, कोणी कोणाचे कौतुक करावे हा त्यांचा विषय आहे. संजय राऊत यांनी काल यावर उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्याबरोबरच नाही, महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली. अनेक लोक पक्ष फोडतात, पण राग या गोष्टीचा आहे की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे पाप केले. त्यांनी दिलेले नाव, चिन्ह चोरण्याचे पाप केले. त्यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी आम्ही जे करार केले होते, ते सगळे प्रकल्प दुस-या राज्यात पाठवण्याचे पाप एकनाथ शिंदे यांनी केले, असे यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटले.
तर, आम्ही मागच्या महिन्यात शरद पवारांना भेटलो. आम्ही त्यांना नेहमी भेटत असतो. तर आम्ही ज्या कोणाला भेटतो, त्यांना आम्ही का भेटतो, हे स्पष्टपणे सांगत असतो, असे यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितले.
चौकशीला घाबरून पळून जात आहेत
तसेच, जे पळून जात आहेत, ते जय महाराष्ट्र करत नाहीत, जय गुजरात करत जात आहेत. चौकशीला घाबरून जात आहेत. त्यामुळे ते जय महाराष्ट्र म्हणू शकत नाहीत. त्याशिवाय, आम्ही विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केले नाही. जे महाराष्ट्राला लुटतात, पक्ष फोडतात, कुटुंब फोडतात आम्ही त्यांचे कधीच कौतुक करणार नाही, असेही यावेळी आदित्य ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.