बीड : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात मुंडेंनी माहिती लपवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. या तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडेंना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही नेते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच न्यायालयाने बजावलेल्या आदेशामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. तर या कारणे दाखवा नोटीसवर २४ फेब्रुवारीला परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
धनंजय मुंडे यांनी २०२४ च्या परळी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे यांच्या तीन मुली तर करुणा मुंडेंच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.
परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. यावर आक्षेप घेत करुणा मुंडे यांनी परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने आता या तक्रारीची दखल घेत नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.