मावळ : प्रतिनिधी
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी गुलाबाच्या फुलांची मागणी अधिक होत असते. याच अनुषंगाने मावळ तालुक्यातून परदेशात गेल्या एक महिन्यात ८० लाख गुलाब फुलांची निर्यात झाली असून एका फुलाला चौदा ते सोळा रुपये भाव मिळाला. त्यामुळे राज्यात सर्वांत जास्त परदेशी गुलाब फुले निर्यात करणारा मावळ पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाईमध्ये उत्साह संचारलेला असतो. प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस दोन दिवसांवर आलेला आहे. जगभरात साज-या केल्या जाणा-या व्हॅलेंटाईन निमित्ताने गुलाबाचे फूल गिफ्ट म्हणून दिले जात असते. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची मागणी वाढत असते. यामुळे मावळमधून मोठ्या प्रमाणात गुलाबाची निर्यात करण्यात येत असते. मागील महिनाभरापासून गुलाब फुलांची निर्यात केली जात आहे.
जपान, युरोपात निर्यात
मावळमधील गुलाब फुले हॉलंड, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, जपानसह युरोपातील देशात निर्यात केली जातात. जगभरातील प्रेमी मावळमधील गुलाबाच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते. यावर्षी परदेशात ४२ सेंटीमीटरच्या गुलाबाला ११ रुपये, ५२ सेंटीमीटरच्या गुलाबला पंधरा रुपये, तर ६२ सेंटीमीटरच्या गुलाबाला १६ रुपये असा भाव मिळाला आहे.
वातावरणामुळे झाला परिणाम
गेल्या दीड महिन्यापासून तापमानातील चढ-उतार व ढगाळ हवामानामुळे गुलाब फुलांच्या शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे पाहावयास मिळाले होते. गुलाब फुले निर्यातीचा कालावधी सुरू होण्यापूर्वीच दहा दिवस फुले उमलण्यास सुरुवात झाल्याने काही उत्पादकांना ती स्थानिक बाजारपेठेत कमी भावात विकावी लागली होती. हवामानातील चढ-उतारामुळे आठ ते दहा दिवस लवकर सुरुवात झाल्याने मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात गुलाब फुले उत्पादकांची तारांबळ उडाली होती.