बीड : प्रतिनिधी
सरकारने मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दोन मागण्या मान्य केल्याने आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. मात्र सरकार मागण्या मान्य करायला जाणूनबुजून वेळ लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. नेहमी आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे आज मवाळ दिसले.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी सांगितले की, आम्ही आठ मागण्या केल्या होत्या त्यापैकी चार मागण्या मान्य केल्या जातील असे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात फक्त दोनच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली असली तरी केवळ मुदतवाढ पुरेशी नाही. त्या समितीला आवश्यक मनुष्यबळ आणि संसाधने मिळायला हवीत.
आगामी साखळी उपोषणाबाबत विचारले असता जरांगे म्हणाले गावक-यांसोबत चर्चा करून उद्या निर्णय घेऊ. यासंदर्भात उद्या सकाळी अंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली जाईल. मात्र, सरकारने घेतलेले निर्णय केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षात अमलात आले पाहिजेत. याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, मंत्री उदय सामंत यांच्या सांगण्यावरून मी संयम पाळत आहे. मात्र, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सरकारने पुढील आठवडाभरात मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत जरांगे म्हणाले, पुढील मंगळवारपर्यंत सरकारने उर्वरित मागण्या मान्य कराव्यात. जर तसे झाले नाही तर आम्हाला पुढील आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. मात्र, जर एका लेकराला वेगळा न्याय आणि दुस-याला वेगळा न्याय दिला गेला, तर आंदोलन सुरूच राहील, असे म्हणत जरांगेंनी सरकारवर दबाव टाकला.