नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसने मोठे फेरबदल केले असून पक्षाने गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करीत त्यांच्या जागी हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांची महाराष्ट्राचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तर विजय वडेट्टीवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. राज्यातील २८८ जागांपैकी केवळ १६ विधानसभेच्या जागा जिंकल्या. यानंतर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी १३ जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले. यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी आणखी सुधारेल असे वाटत होते मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
सपकाळ हे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची राजीव गांधी पंचायती राज संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी मीनाक्षी नटराजन यांची जागा घेतली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्रातील बुलढाणा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यात गेली. शिवसेनेचे शिंदे गटाचे संजय गायकवाड हे सध्या येथून आमदार आहेत.