लातूर : प्रतिनिधी
शहरातील भामरी चौक ते जुना एमआयडीसी रोड येथील रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून ठप्प आहे. ठेकेदाराने रस्त्यावर मोठमोठे दगड आणि खडी टाकून काम थांबवले असून, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांची संख्या वाढली असून, अनेक दुचाकीस्वार घसरुन पडले आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि रात्रीच्या अंधारात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खराब रस्त्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहने वारंवार पंक्चर होत आहेत. अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले असून, काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासन आणि ठेकेदारांचा भोंगळ कारभार नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असूनही प्रशासन आणि ठेकेदार याकडे लक्ष देत नाहीत. महापालिकेकडून केवळ आश्वासनांची पेरणी केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. रस्ता बंद का आहे आणि काम का सुरू होत नाही, यावर प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नाही.
नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत, त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच, खड्ड्यांवर तातडीने मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. महापालिका अधिका-यांनी काम लवकरच सुरू होईल, असे गुळमुळीत उत्तर दिले असले, तरी नागरिक आता आक्रमक झाले आहेत. जर लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला नाही, तर मोठ्या आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.