20.3 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्रमावळचे ८० लाख गुलाब विदेशी व्हॅलेंटाईनच्या मोहात

मावळचे ८० लाख गुलाब विदेशी व्हॅलेंटाईनच्या मोहात

मावळ : प्रतिनिधी
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या काळात गुलाबाच्या फुलांची मागणी अधिक होत असते. याच अनुषंगाने मावळ तालुक्यातून परदेशात गेल्या एक महिन्यात ८० लाख गुलाब फुलांची निर्यात झाली असून एका फुलाला चौदा ते सोळा रुपये भाव मिळाला. त्यामुळे राज्यात सर्वांत जास्त गुलाब फुले परदेशी निर्यात करणारा मावळ राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाईमध्ये उत्साह संचारलेला असतो. जगभरात साज-या केल्या जाणा-या व्हॅलेंटाईन निमित्ताने गुलाबाचे फूल गिफ्ट म्हणून दिले जात असते. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची मागणी वाढत असते. यामुळे मावळमधून मोठ्या प्रमाणात गुलाबाची निर्यात करण्यात आली. मागील महिनाभरापासून गुलाब फुलांची निर्यात केली जात आहे.

गेल्या दीड महिन्यापासून तापमानातील चढ-उतार व ढगाळ हवामानामुळे गुलाब फुलांच्या शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे पाहावयास मिळाले होते. गुलाब फुले निर्यातीचा कालावधी सुरू होण्यापूर्वीच दहा दिवस फुले उमलण्यास सुरुवात झाल्याने काही उत्पादकांना ती स्थानिक बाजारपेठेत कमी भावात विकावी लागली होती. हवामानातील चढ-उतारामुळे आठ ते दहा दिवस लवकर सुरुवात झाल्याने मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात गुलाब फुले उत्पादकांची तारांबळ उडाली होती.

प्रामुख्याने दुबई, युरोपात निर्यात
मावळमधील गुलाब फुले हॉलंड, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, जपानसह युरोपातील देशात निर्यात केली जातात. जगभरातील प्रेमी मावळमधील गुलाबाच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते. यावर्षी परदेशात ४२ सेंटीमीटरच्या गुलाबाला ११ रुपये, ५२ सेंटीमीटरच्या गुलाबला पंधरा रुपये, तर ६२ सेंटीमीटरच्या गुलाबाला १६ रुपये असा भाव मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR