इंदूर : काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह, जे मध्य प्रदेशातील प्रमुख नेते आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि ते म्हणाले की चिप असलेली कोणतीही मशीन हॅक केली जाऊ शकते. यानंतर मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काही माजी आमदारांनी त्यांच्या गावात ५० मतेही मिळाली नसल्याची तक्रार केली आहे. अशा निकालांवर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पक्षाच्या खराब कामगिरीच्या कारणांचे विश्लेषण करण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांशी चर्चा करणार असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) हॅक केल्याचा आरोप केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, चर्चेशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य होणार नाही. मी आधी सर्वांशी बोलेन, त्यानंतर याबाबत मत स्पष्ट कारेन असे त्यांनी सांगितले. कमलनाथ यांनी पत्रकारांना सांगितले की, तुम्हालाही माहिती आहे की, जनतेचा काय मूड होता. तुम्ही मला का विचारताय? लोकांना विचारा. काही आमदार मला सांगत आहेत की, त्यांना त्यांच्या गावात ५० मतेही मिळाली नाहीत. हे कसे शक्य आहे? असे ते म्हणाले.
यापूर्वी कमलनाथ म्हणाले होते की, त्यांना जनतेचा जनादेश मान्य आहे आणि विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आपली जबाबदारी पार पाडेल. निवडणूक निकालात मध्य प्रदेशातील जनतेचा निर्णय मला मान्य आहे. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी देण्यात आली असून आम्ही आमची जबाबदारी पार पाडू.