बीड: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र राहावे, त्यांच्यामागे आम्ही उभे राहू असे महत्वाचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. त्यामध्ये फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’च्या निमित्ताने एकत्र आलेले मुंडे बहीण-भाऊ आता बीडच्या राजकारणातही एकत्र येणार का याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
देवेद्र फडणवीस यांनी राज्यात राबवण्यात येणा-या अनेक योजनांची माहिती जनतेला दिली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना त्याचा फायदा धाला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांनाच आजच्या कार्यक्रमाची उत्कंठा आहे. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी असंच एकत्र राहावं, एका स्टेजवर राहावं. आमच्या तिघांची अशी ताकद तुमच्या मागे उभी करू की पळचीच काय बीडही आपलं असेल. परळी, बीडसोबत महाराष्ट्राचं कल्याण करू. हा मंच असाच राहो.
माननीय मुख्यमंत्री वैधनाठ देवस्थानचा विकास आराखडा केंद्राकडून मंजूर करून आणणार आहे. आम्ही तिघे एकत्रित आल्या नंतर आमच्या तिघांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. तुम्हाला शेजारच्या घरात कुणी विचारत नाही, आम्हाला शेजारच्या राज्यात प्रचारासाठी बोलवतात असा टोलाही त्यानी उद्धव ठाकरेंना लगावला.