26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeराष्ट्रीयअयोध्येला जाणारे ४ भाविक अपघातात ठार

अयोध्येला जाणारे ४ भाविक अपघातात ठार

लखनौ – रविवारी पहाटे पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर बंद पडलेल्या खासगी बसला ट्रॅव्हलर बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात महाराष्ट्रातून अयोध्येला ट्रॅव्हलरने जाणा-या चार भाविकांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने गाडीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले.

छत्तीसगडहून अयोध्येला भाविकांना घेऊन जाणा-या खासगी बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ही बस पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर लोणी कटरा पोलिस स्टेशन हद्दीतील फुटा भवानीपूर गावाजवळ रस्त्यावर थांबविण्यात आली. पहाटे ५ वाजण्याच्या सुमाराला महाराष्ट्रातील भाविकांना घेऊन मिनीबस अयोध्येला जात होती.

अचानक बंद पडलेली खासगी बस समोर दिसताच चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले. मिनी बस ही खासगी बसला मागून जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, मिनीबसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर प्रवासी केबिनमध्ये अडकून राहिले. त्यांनी मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. परिसरातील लोकांनी कळविल्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले.

गॅस कटरच्या मदतीने मिनीबसमधून अडकलेले ३ मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात एकूण ४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR