नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत यमुना नदीची स्वच्छतेवरून भाजप आणि आपमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता येताच यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात भाजपची सत्ता येताच यमुनेच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. नवीन सरकारच्या स्थापनेपूर्वीच उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या सूचनेनुसार मोठमोठ्या मशीन लावून यमुना स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.
यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी आधुनिक मशिन्स वापरल्या जात आहेत. यामध्ये ४ स्किमर मशीन, २ वीड हार्वेस्टिंग मशीन आणि एक डीटीयू मशीनचा समावेश आहे. सध्या यमुना स्वच्छ करण्यासाठी ७ आधुनिक यंत्रांसह मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या पूर आणि पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी नवीन चौधरी यांना यमुनेच्या सुरुवातीच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दोन प्रकारचे कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. रविवारपासून पहिल्या कृती आराखड्याचे काम सुरू झाले असून, त्याअंतर्गत सध्या कच-याची विल्हेवाट लावण्यात येत आहे.
प्रथम दिल्लीतील वजिराबाद ते ओखलापर्यंत यमुना नदीत पसरलेला घनकचरा बाहेर काढला जाईल. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला शहरातील औद्योगिक युनिट्स नाल्यांमध्ये घाण पाणी सोडणार नाहीत याची खात्री करण्यास सांगितले आहे. दरम्यान, यमुनेत किती कचरा पसरला आहे, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित आकडेवारी नाही. त्यामुळे या घनकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी किती वेळ लागेल, हे काम सुरू झाल्यानंतरच कळेल. यमुना पूर्णपणे नाला बनली आहे, त्यामुळे नदीला पूर्ववत होण्याची थोडा वेळ लागणार आहे.