बीड : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सातत्याने सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आक्रमक झालेले भाजप आमदार सुरेश धस पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मंत्री धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयाची माहिती कृषी विभागाला पत्र पाठवून आमदार सुरेश धस यांनी मागितली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण राज्यभर गाजत आहे. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात तडजोड झाल्याचं बोललं जात होतं.
विरोधकांनीही सुरेश धस यांनी तडजोड करू नये, अशी मागणी धरली होती. अशात भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलं आहे. कृषी विभागाला दिलेल्या पत्रात कृषी विभागाच्या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार झाल्याचे म्हटले आहे. तसेच, चार बाबींची प्रामुख्याने मागणी केली गेली आहे.