मुंबई : विधानसभेतील पराभवानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील संघटनेत बदल करण्यात येत आहे. ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावे, असा काँग्रेस नेतृत्वाचा विचार सुरू होता.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यानंतर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचे नेता करण्यात आले.
यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतील.
नाना पटोले यांनी चार वर्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका, पोटनिवडणुका व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन, ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली.
दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यासर्व प्रदेश कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. पदग्रहण सोहळ्याची तयारी झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आले आहे.