नवी दिल्ली : महासत्ता म्हणवणारा अमेरिका इतर देशांना कर्ज देतो, हे तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल. पण, अमेरिकेवरही इतर देशांचे अब्जावधी डॉलर्सचे कर्ज, हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण, अमेरिकेसारख्या महासत्ता देशावरही अनेक देशांचे कर्ज आहे. या कर्ज देणा-या देशांमध्ये चीन आणि जपान व्यतिरिक्त भारताचाही समावेश आहे. अमेरिकेने भारताकडून २३४ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे.
डीडब्ल्यूच्या अहवालानुसार, भारताने सुमारे २३४ अब्ज डॉलर्स किमतीचे यूएस ट्रेझरी बॉण्ड्स खरेदी केले आहेत असे केल्याने तो अमेरिकेच्या सर्वोच्च परदेशी कर्जदारांपैकी एक बनला आहे. अमेरिकेच्या विदेशी कर्जदारांमध्ये जपान अव्वल आहे. त्याने ११०० अब्ज डॉलर्स किमतीचे यूएस ट्रेझरी बॉन्ड्स खरेदी केले आहेत. चीन दुस-या क्रमांकावर आहे. चीनने ७६८.६ अब्ज डॉलर्स किमतीचे यूएस ट्रेझरी बॉण्ड्स विकत घेतले आहेत. तर ब्रिटन तिस-या क्रमांकावर आहे. ब्रिटनने ७६५ अब्ज डॉलर्स किमतीचे यूएस ट्रेझरी बॉन्ड्स खरेदी केले आहेत.
अनेक देशांचे अमेरिकेवर कर्ज
जपान, चीन, ब्रिटन आणि भारताशिवाय लक्झेंबर्गचेही अमेरिकेवर कर्ज आहे. लक्झेंबर्गने ४२४.५ अब्ज डॉलर्स किमतीचे यूएस ट्रेझरी बॉण्ड्स खरेदी केले आहेत. याशिवाय फ्रान्स, कॅनडा, बेल्जियम, आयर्लंड, केमन आयलंड, स्वित्झर्लंड, तैवान, सिंगापूर आणि हाँगकाँग यांनीही यूएस ट्रेझरी बॉण्ड्स खरेदी केले आहेत.
ट्रेझरी बॉण्ड म्हणजे काय?
यूएस सरकार आपला खर्च भागवण्यासाठी ट्रेझरी बॉण्ड जारी करते. हे रोखे खरेदी करून अनेक देश अमेरिकन सरकारला कर्ज देतात. यूएस सरकार या रोख्यांच्या बदल्यात जे काही पैसे घेते, ते निर्धारित वेळेनंतर व्याजासह परत करते. यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षित परतावा मिळतो. जगातील अनेक मोठ्या बँका आणि संस्था या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. असे नाही की फक्त यूएस सरकार असे ट्रेझरी बॉण्ड जारी करते. जगभरातील देश असे ट्रेझरी बॉण्ड जारी करतात, ज्यामध्ये मोठ्या बँका आणि संस्था गुंतवणूक करून चांगला नफा कमावतात.