अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिरात सध्या प्रचंड गर्दी दिसत आहे. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणारे भाविक मोठ्या संख्येने अयोध्येतही जात आहेत. दरम्यान सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक मोठा कट हाणून पाडण्यात आला आहे. मंदिरात रामललाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत एक ड्रोन अचानक पडले. हे हवाई संकट पाहून लोक गडबडले. मात्र, तेथे तैनात असलेल्या अँटी ड्रोन सिस्टिमने ते तत्काळ हाणून पाडले. यानंतर, सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण एजन्सीज सतर्क झाल्या आहेत.
राम मंदिर परिसरात ड्रोन उडवल्याबद्दल एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी गेट क्रमांक ३ वर ही घटना घडली. राम मंदिर परिसरात भाविकांच्या प्रचंड गर्दीत अचानक एक ड्रोन पडले. यानंतर, अँटी ड्रोन सिस्टिमच्या ट्रायलला वेग आला आहे.
ड्रोन पडल्याने उडाली खळबळ
राम मंदिराच्या आवारात ड्रोन पडल्याने खळबळ उडाली आहे. देशात महाकुंभ सुरू असताना आणि मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असताना ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ ड्रोन ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. राम मंदिर परिसर ड्रोन पडल्याच्या घटनेच्या तपासात, हा कट असल्याचे बोलले जात आहे.
कृत्याचा छडा लावण्याचा प्रयत्न
गर्दीमध्ये चेंगराचेंगरी निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले गेले असावे असे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी अज्ञात तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि ते ड्रोनच्या मदतीने कृत्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.