नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताची चिंता वाढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या चांगल्या संबंधाची चर्चा झाली. मात्र, ट्रम्प टेरिफची धमकी देत भारतासह अनेक देशांना धमकावत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावाने आयात शुल्क लागू करण्याची धमकी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीने भारताच्या निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय लागू केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी ७ अब्ज डॉलर्स म्हणजेच ५८,००० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
सिटी ग्रुपच्या रिपोर्टनुसार ट्रम्प सरकारच्या यानिर्णयामुळे भारताला दरवर्षी ५८ हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. भारत सरकार ट्रम्प यांच्या नव्या कराच्या रचनेला समजून घेण्यासाठी आणि याचा फटका बसण्यापासून वाचण्यासाठी अमेरिकेसोबत एक नवा व्यापार करार करण्याची तयारी करत आहे. टॅरिफमुळे सर्वाधिक केमिकल्स, धातू उत्पादने, दागिने ही क्षेत्र प्रभावित होतील. याशिवाय ऑटोमोबाइल, फार्मास्युटिकल्स आणि खाद्यान्न उत्पादनांवर प्रभाव पडेल. वस्त्रोद्योग, लेदर आणि लाकडी उत्पादने देखील प्रभावित होऊ शकतात.
फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार भारताने २०२४ मध्ये पर्ल्स, जेम्स आणि ज्वेलरीची निर्यात अमेरिकेत केली होती. त्याचं मूल्य ८.५ अब्ज डॉलर्स इतकं होतं. दुस-या क्रमांकावर फॉर्मास्युटिकल्स होतं, त्याची ८ अब्ज डॉलर्सची निर्यात अमेरिकेला केली होती. पेट्रोकेमिकल्स ची ४ अब्ज डॉलर्सची निर्यात केली. भारताचे व्यापार आयात शुल्क ११ टक्के आहे जे अमेरिकेच्या दरापेक्षा २.८ टक्के अधिक आहे.
अमेरिकेला भारताकडून ४२ अब्ज डॉलर्सची निर्यात केली जाते. मात्र, यावर भारतात त्यावर अधिक टॅरिफ लावलं जातं. लाकूड आणि मशिनरीवर ७ टक्के टॅरिफ, शूज आणि ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट १५-२० टक्के टॅरिफ, खाद्यपदार्थांवर ६८ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादलेलं असतं. खाद्य पदार्थांवर अमेरिकेचा सरासरी टॅरिफ ५ टक्के तर भारताचा ३९ टक्के आहे. भारत अमेरिकेत बनवलेल्या दुचाकींवर १०० टॅरिफ लादतो तर अमेरिका भारतीय दुचाकींवर २.४ टक्के टॅरिफ आकारतो.