चेन्नई : मिचॉन्ग चक्रीवादळचा सर्वाधिक परिणाम चेन्नईत दिसून आला आहे. एनडीटीपीच्या अहवालानुसार, मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विमानतळ पूर्णपणे बंद करावे लागले आहे. तसेच तामिळनाडूची राजधानी चेन्नईला जोडणारी एक हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. इंडिगोने आतापर्यंत ५५० उड्डाणे रद्द केली आहेत तर विस्तारा एअरलाइन्सने सोमवारपासून १० उड्डाणे रद्द केली आहेत.
चेन्नईत पाऊस थांबला असला तरी पावसामुळे साचलेले पाणी अजूनही बाहेर पडू शकलेले नाही. त्यामुळे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळ मिचॉन्ग देखील हळूहळू आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. चेन्नई विमानतळाने सोमवारी खराब हवामानामुळे निर्गमन आणि आगमनासाठी धावपट्टी बंद केली होती. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे रविवारी रात्रीपासून चेन्नईत मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे शहर पाण्याखाली गेले होते. रेल्वे आणि उड्डाणे रद्द करण्यात आली. चक्रीवादळ लवकरच आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणम विमानतळ सध्या बंद करण्यात आले आहे.