कोच्ची : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी दृश्यम ३ या सिनेमाची घोषणा केली आहे. दृश्यमचे आत्तापर्यंत दोन पार्ट आले आहेत. सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. एवढेच नाही तर दृश्यम १ आणि दृश्यम २ या सिनेमांची अनेक भाषांमध्ये रीमेक देखील पाहायला मिळाले आहेत. आत मोहनलाल यांनी दृश्यम ३ ची घोषणा केली. त्यांच्या या सिनेमाचे दिग्दर्शन जीतू जोसेफ करणार आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वरुन मोहनलाल यांनी या सिनेमाची घोषणा केली.
मोहनलाल यांनी सोशल मीडियाच्या ७ प्लॅटफॉर्मवर दृश्यम ३ च्या निर्मात्यांसह एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी दृश्यम ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले आहे. मोहनलाल यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार आणि दिग्दर्शकांचे अनेक चाहते दृश्यम ३ बाबत उत्सुक असल्याचे बोलत आहेत. दृश्यम हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. ज्याने मल्याळम सिनेमाला एका मोठ्या उंचीवर नेले आहे.
हा चित्रपट इतका यशस्वी झाला की त्याचा हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, सिंहली आणि अगदी चिनी भाषेतही रिमेक झाला. दृश्यम हा सिनेमा २०१३ साली प्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा मल्याळम सिनेमाच्या इतिहास महत्त्वपूर्ण ठरला होता. दृश्यमच्या आठ वर्षांनंतर, दुसरा भाग प्राइम व्हीडीओवर रिलीज झाला आणि पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. आता दृश्यमच्या तिस-या पार्टबाबत सर्वांच्या उत्सुकता वाढल्या आहेत.