कोल्हापूर : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना शाहूपुरी पोलिसांनी आज, शुक्रवारी ताब्यात घेतले. मंत्री कोकाटे कोल्हापूरात येण्यापुर्वीच चर्चेसाठी बोलावलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि पोलिस व त्यांच्यात जोरदार झटापट, धक्काबुक्की झाली. जोपर्यंत मंत्री कोकाटे हे महाराष्ट्रातील शेतक-यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना ‘स्वाभिमानी’ हिसका दाखवू, असा इशाराही यावेळी दिला.
एक रुपया भिकारीही घेत नाही, पण आम्ही शेतक-यांना त्या पैशात पीक विमा देतो असे वक्तव्य मंत्री कोकोटे यांनी केले होते. त्याचे पडसाद राज्यभर उमटले असून स्वाभिमानी’ने याविरोधात आंदोलन उभारले आहे. मंत्री कोकाटे हे शुक्रवारी कोल्हापूरात येणार म्हटल्यानंतर संघटनेने त्यांच्याविरोधात आंदोलन करुन जाब विचारण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत मंत्र्यांसोबत चर्चा करण्याची ग्वाही दिली होती. त्यासाठी, संघटनेच्या कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहात ही बोलावले होते.
मंत्री कोकाटे हे दुपारी साडे बारा वाजता कोल्हापूरात येणार असल्याने संघटनेचे पदाधिकारी तिथे पोहचले, ते विश्रामगृहाच्या बाहेर चहा घेत असतानाच पोलिसांनी झडप टाकून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने गोंधळ उडाला. शेतकरी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांसोबत त्यांची झटापट व धक्काबुक्की झाली. पोलिस व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केल्याने वातावरण काहीकाळ तणावपुर्ण बनले.