चारठाणा : येथील शेत मालक संजय देशपांडे यांच्या शेतातील शेत मजुर संदिप आसाराम आवचार यांच्या परिवाराने गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करीत गाईचे संरक्षण करण्याचा एक मोलाचा सल्ला याद्वारे दिला. या वेळी २१ स्त्रियांनी गोमातेला साडीचा आहेर देवून तिची पूजा, ओवाळणी करून ओटी भरली.
या संदर्भात संपर्क साधला असता आवचार यांनी सांगितले की त्यांच्या घरामध्ये पिढ्यांपिढ्या गोपालनाचा व्यवसाय केला जातो. गाईचे संरक्षण व्हावे, तिची सेवा घडावी, प्रत्येक शेतक-याने तिचे संरक्षण करावे या कार्यक्रमा मागचा उद्देश असल्याचे सांगितले. हिंदू धर्मानुसार गोमातेमध्ये १२ आदित्य आठ बसु, अकरा रुद्र व दोन अश्विन कुमार मिळून तेहतीस आहेत. त्यामुळेच हिंदू धर्मात गोमातेला जास्तीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. ऋग्वेदात तर गाईला अग्न्या म्हटले आहे.
गाय ही अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो तर संपत्तीचे घर असल्याचे अथर्ववेद सांगतो. त्यामुळेच वेगवेगळ्या आख्यायिकानुसार गाय हे विष्णूचे रूप असल्याचे म्हटले जाते. कत्तलखान्यात जाणा-या गायीला वाचवून तिच्या पालनपोषणाची व्यवस्था केल्याने माणसाला गो यज्ञाचे फळ मिळते. यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे सांगितले.
या वेळी उपस्थित स्त्रियांना सुद्धा साडीच्या व रुमाल टोपीच्या स्वरूपात संदीप अवचार व त्यांची पत्नी रेणुका यांनी आहेर देऊन स्वादिष्ट व रुचकर जेवणाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमासाठी सुवर्णा अवचार, काशिबाई होले, रुखमीणबाई आवचार, मुक्ता रासवे, मनिषा अवचार, अंकिता रासवे, राधा होले, सावता आवचार, सावता वानखरे, वर्षा घाटुळ, अशोक घाटुळ, अमोल काळे व समस्त गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी पञकार एकनाथ आवचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका कार्यकरणी सदस्य अनिल देशपांडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.