लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनातंर्गत वैयक्तीक सिंचन विहिर, क्रीडांगणांच्या कामावर अधिक भर दिसून येत आहे. उन्हाळयाचे दिवस असल्याने शेतकरी सिंचन विहिरीला अधिक महत्व देत आहेत. रोहयोच्या कामावर मजूर वाढल्यांने शाळांच्या क्रीडांगणांच्या कामांनी अधिक गती घेतल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे जिवनमान उंचावण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनातंर्गत सुरू आहे. शेतक-यांनी आपल्या शेतात वैयक्तीक सिंचन विहिर, जनावरांचा गोठा, बांबू लागवड, वृक्ष लागवड व संगोपण, रस्ते, शेततळे ही शेतातील कामे सध्या मोठया प्रमाणात सुरू झाली आहेत. तसेच गावात घरकूल, रस्ते, वृक्ष लागवड व संगोपण करणे, ग्रामपंचायत भवन, शाळेसाठी क्रीडांगण तयार करणे आदी कामे ग्रामपंचायतींनी हाती घेतली आहेत.
रोहयोच्या कामासाठी जिल्हयात जवळपास ३ लाख ७७ हजार ६९० कुटूंबातील ८ लाख ९२५ नागरीकांनी रोजगारासाठी नोंदणी करून जॉबकार्ड काढले आहेत. त्यामुळे जिल्हयातील ४५१ ग्रामपंचायतींच्या गावामध्ये सध्या रोहयोची २ हजार ४२ कामे सुरू असून या कामावर १ लाख ४२ हजार २६७ मजूरांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे.