औसा : संजय सगरे
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औसा शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आता प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस, शिक्षक, पत्रकार,व्यापारी आणि सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वच्छ औसा सुंदर औसा ही जनचळवळ हाती घेतली असून याचा श्रीगणेशा शुक्रवारी सकाळी दोन तास श्रमदान करून करण्यात आला.
यात प्रामुख्याने जनतेची वर्दळ असणा-या बसस्थानक व त्यापुढील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळ मजल्याची स्वत:अधिका-यांसह मोहिमेत सहभागी सर्वांनी हातात फावडे, खराटे, टोपली घेवून स्वच्छता केली. उपक्रमाची सर्वत्र चर्चा व कौतुक होत आहे. मी व माझे कार्यालय, घरे, परिसर आणि शहर स्वच्छ व सुंदर कसे दिसेल. जेणेकरून स्वत: सह शहरवासीयांचे आरोग्य उत्तम राहील यासाठी येथील प्रशासकीय अधिका-यांनी पुढाकार घेत आपल्या कार्यालयातून स्वच्छतेस प्रथम सुरुवात केली. यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्वच्छ आदर्शवत बनले. हा उपक्रम शहरात तहसीलदार घनश्याम अडसूळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांनी राबविला.
स्वच्छ औसा सूंदर औसा या जनचळवळीची मुहुर्तमेढ रोवली. यात दहा दिवसापूर्वी शिक्षक संघटना, सर्व अधिकारी,पोलीस, एसटी महामंडळ, आरोग्य विभाग,नगरपालिका,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी आणि तरुणांना एकत्रित करून या संकल्पना मांडण्यात आली. सर्वांनी या स्वच्छतेच्या सामाजिक उपक्रमाला समंती दर्शवित स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी मुख्याधिकारी मंगेश शिंदे, सपोनि सुनील रजितवाड, डॉ. सगरे, पंढरी ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य, सेवाभावी संस्था, पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, व्यापा-यांनी बंधूंनी सहभाग घेतला होता.