सोलापूर : फेब्रुवारी महिन्याच्या आरंभात राज्यातील ज्या बागायतदारांची द्राक्ष मार्केटमध्ये गेली त्यांच्या मालाला चांगला दर मिळाला मात्र या चालू आठवड्यात व्यापारी बांधवांनी एकी करून शेतकरी बांधवांच्या द्राक्षाचे भाव पाडल्याची खंत काही द्राक्ष बागायतदार शेतक-यांनी व्यक्त केली. दरम्यान, आहे तो भाव तरी आता कायम राहावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
फेब्रुवारीच्या सुरूवातीला द्राक्ष उत्पादकांच्या द्राक्षास प्रती किलोस लोकल मार्केटमध्ये ७० ते ९० रूपयांपर्यंत दर मिळत होता तर निर्यातक्षम द्राक्षास १०० ते १२० रूपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र सध्या राज्यातील नाशिक, आणि सोलापूर विभागातील सांगली, विटा, कोल्हापूर, सातारा काही भागातून मोठ्या प्रमाणातून द्राक्ष बाजार समित्यांकडे येत असल्याने त्याचे दर व्यापा-यांनी ४५ ते ६० रूपये प्रतिकिलोंवर आणले आहेत. तर विदेशात निर्यातीचे दर ८० ते ८५ रूपयांवर आले आहेत.
यामुळे द्राक्ष बागायतदार शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान अजून मोठ्या प्रमाणात द्राक्ष मार्केटमध्ये येणार असल्याने हा भाव स्थिर राहावा, अशी अपेक्षाही जाणकार शेतकरी बांधवांची आहे. तरच बागायतदारांना बागांचा खर्च जावून काहीतरी पदरात पडणार आहे. एप्रिल ते मे महिन्यातही सोलापूर विभागातील काही द्राक्ष आणि नगर जिल्ह्यातील उशिराने घेतलेली द्राक्ष येतात. आता किमान सध्या आहे तो दर स्थिर राहावा, इतकी बळीराजाची माफक अपेक्षा आहे.
गतवर्षी अवकाळी पावसामुळे बागांचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा वादळी वारे, अवकाळी पावसामुळे बागांचे नुकसान झाले नसल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. द्राक्ष बागांना जोपासण्यासाठी मजूरवर्ग, औषधे, अंतर्गत मशागतीसाठी मोठा आर्थिक खर्च असतो. यामुळे द्राक्ष उत्पादन झाल्यावर बाजारातून शेतक-यांच्या मालास चांगला दर मिळणे गरजेचे आहे. बाजारात दर पडल्यास शासनाकडून द्राक्ष उत्पादनासही हमी भाव मिळावा, अशी अपेक्षा राज्यातील शेतकरी बांधवांची आहे.असे राज्य द्राक्ष बागायतदार संघटना(पुणे विभाग)संचालक हनुमंत गवळी यांनी सांगीतले.