लातूर : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील २० लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि १० लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात आले. यानिमित्ताने लातूर जिल्हास्तरीय, तसेच पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमात जिल्ह्यातील ४६ हजार ८६८ लाभार्थीना मंजुरी आदेश व २४ हजार ४६६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात आला.
अहमदपूर पंचायत समिती येथील कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, औसा येथील कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाला लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर उपस्थित होत्या. सन २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लाभार्थी जिल्हास्तरीय, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बालेवाडी, पुणे येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हास्तरीय, पंचायत समितीस्तरीय व ग्रामपंचायतस्तरीय कार्यक्रमात दाखविण्यात आले.सर्वसामान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या दुस-या टप्प्यात सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात ४६ हजार ८६८ घरकुलांना मंजुरी दिली आहे. यापैकी २४ हजार ४६६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत केला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून लाभार्थ्यांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १० लाभार्थ्यांना मंजुरी आदेश आणि ५ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.