नागपूर : वृत्तसंस्था
हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यामधील कलम २० अनुसार स्वत:चे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान अविवाहित मुलीलाही वडिलाला पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी दिला.
२४ जानेवारी २०२४ रोजी अकोला कुटुंब न्यायालयाने एका सज्ञान अविवाहित मुलीला पाच हजार रुपये महिना पोटगी मंजूर केल्यामुळे वडिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीआरपीसी कलम १२५ अनुसार सज्ञान अविवाहित मुलगी पोटगी मिळण्यासाठी पात्र नाही, असा दावा वडिलाने केला होता. उच्च न्यायालयाने हा दावा लक्षात घेता मुलीचे हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यांतर्गतचे अधिकारही स्पष्ट केले. सीआरपीसी कलम १२५ अनुसार सज्ञान अविवाहित मुलगी तिला शारीरिक-मानसिक समस्या असेल तरच पोटगीसाठी पात्र आहे.
सामान्य सज्ञान अविवाहित मुलीला या कायद्यांतर्गत पोटगी दिली जाऊ शकत नाही. परंतु, हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यामधील कलम २० अनुसार स्वत:चे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान अविवाहित मुलीला वडिलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
या प्रकरणातील मुलीचे आई-वडील कौटुंबिक वादामुळे वेगळे झाले आहेत. मुलगी आईसोबत राहत असून सध्या ती मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. तिच्याकडे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे तिने कुटुंब न्यायालयात अर्ज करून वडिलाकडून पोटगी मागितली होती.