सोलापूर : येथील एस.टी. बसस्थानकावर चो-यांचे प्रमाण वाढल्यामुळे महिलांसाठी चिंताजनक बाब बनली आहे. एसटी प्रशासन व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. एसटी बसस्थानक असुरक्षित बनले असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
सोलापूर हे कर्नाटक, तेलंगणा या राज्यांच्या सीमेवरचे शहर आहे. त्याबरोबर सोलापूरच्या जवळच तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर हो धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे सोलापूरला येणा-या व जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातच आता सरकारने महिलांना एसटीच्या प्रवासात तिकिटामध्ये ५० टक्के व ७५ वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सूट दिल्याने प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे.
स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल्या इच्छित ठिकाणी लवकर पोहोचण्याची घाई झालेली असते. त्यामुळे खासगी बससेवा, जीप व इतर वाहनांचा आधार घेतला जातो. परंतु अशाही परिस्थितीत एस.टी. तून प्रवास करणा-यांची संख्या मोठी आहे. त्याला एस.टी.चा सुरक्षित प्रवास हेदेखील कारण आहे. परंतु अलीकडील काळात एस.टी. वेळेवर नसणे, एस.टी.ची दुरवस्था व वाढत्या चो-या यामुळे प्रवासी दुरावला जात आहे. एस.टी.चा प्रवासी टिकवून ठेवण्यासाठी एस.टी. प्रशासन व पोलीस यांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
अलीकडील काळात सोलापूर बसस्थानकात किरकोळ व भुरट्या चो-यांबरोबरच मोठ्या चो-यांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गर्दीचा फायदा घेत चोरटे विशेषता: महिला बसमध्ये चढत असताना पाकीट मारणे, दागिने पळविणे आदी प्रकारच्या चो-या करीत आहेत. मागील काही महिन्यांत मोठ्या चो-या घडल्या होत्या. त्यामध्ये किंमती दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला. परंतु फौजदार चावडी पोलिसांनी चोरट्यांना अटक करून चो-या उघडकीस आणल्या.त्यानंतरही चो-यांचे प्रमाण काही घटले नाही.
गेल्या आठवड्यात प्रियांका सुनील कांबळे (वय ३२, रा अजय सदन भांडुप, मुंबई) या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एक लाखाचा ऐवज लंपास केला. या चोरीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीचा अद्याप तपास लागला नाही.
याशिवाय बसस्थानकात सतत छोट्या-मोठ्या चो-या होत असतात. यातील बहुतांश प्रवासी तक्रार देण्यासाठी पोलिसात जात नाहीत. त्यामुळे चो-यांच्या अनेक घटना होऊनदेखील पोलिसांना त्याची माहिती मिळत नाही. चो-या, पाकीटमारी या घटना थांबविण्यासाठी व बसस्थानक आवारात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्याची गरज आहे. बसस्थानकावरील वाढत्या चो-या रोखण्यासाठी फौजदार चावडी पोलिसांकडून बसस्थानकावर पोलिस कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येते. पोलिसांकडून गस्तही घातली जाते. परंतु वाढत्या चो-या रोखण्यासाठी बसस्थानक आवारात पोलिस चौकी उभारण्याची गरज आहे. पोलिसांचा सतत वावर राहिला तरच चो-या रोखण्यात यश येईल, त्यामुळे याठिकाणी एक पोलिस चौकी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.