पटना : बिहारची राजधानी पटनामध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक आणि रिक्षाच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ७ मजुरांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, कामावरून घरी परतताना रिक्षातील मजुरांचा अपघात झाल्याची घटना घडली. पटना येथील मसौढी-नौबतपूर मार्गावरील धनीचक वळणावर रविवारी सांयकाळी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेल्या मजुरांची ओळख पटली आहे. मतेंद्र बिंद (२५), उमेश बिंद (३८), विनय बिंद (३०), रमेश बिंद (५२), सूरज ठाकूर (२०), उमेश बिंद (३०), रिक्षाचालक सुशीलकुमार (३५) यांच्या नावाचा समावेश आहे. तर ६ मजूर डोरीपार येथे राहणारे आहेत. तर सुशीलकुमार हा हंसाडीह गावात राहायला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, ६ मजूर काम करून घरी जाण्यासाठी रिक्षाने निघाले होते. दोन्ही वाहनांचा रस्त्याच्या किना-यावरील एका खड्ड्याजवळ अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, जेसीबीच्या मदतीने वाहनांना बाजूला काढण्यात आलं. अपघातानंतर ढिगा-यातून मृतदेह बाजूला काढून ताब्यात घेण्यात आले. मढौरी पोलीस ठाण्याचे एसएचओ विजय यादवेंदू यांनी सांगितलं की, ‘चालकाने ट्रकवरील नियंत्रण गमावल्यानंतर अपघात झाला’. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
रिक्षामध्ये एकूण किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघाताविषयी प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना अपघाताविषयी माहिती दिली. अपघातानंतर मजुरांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. मजुरांचे मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मृतकांच्या नातेवाईकांनी सरकारकडे १०-१० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे.