लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून रमाई आणि प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची कामे वेगाने सुरु आहेत. रमाई घरकुल योजनेत आतापर्यंत ४ हजार ३९३ आणि नव्याने ७९ तर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये ५ हजार १९५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. दरम्यान प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी २२ कोटी रुपयांचा निधी लातूर शहर महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे.
शहरामध्ये ज्यांना स्वत:ची जागा आहे. परंतु, घर नाही, अशा नागरीकांसाठी लातूर शहर महानगरपालिकेअंंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शहरात ५ हजार १९५ घरकुल मंजूर झाले आहेत. त्यापैकी ३ हजार ८१४ घरकुलांचे बांधकाम प्रगती पथावर आह. तर ८७ घरकुलांचे काम सुरु झालेले नाही. एका घरकुलासाठी अडीच लाख रुपये या योजनेत दिले जातात. बांधकाम छत लेव्हलपर्यंत आल्यानंतर एक लाख रुपये, त्यानंतर दुसरा हप्ता एक लाख रुपये आणि अंतिम हप्ता ५० हजार रुपयांचा आहे. एकुण तीन टप्प्यात काम पूर्ण होईपर्यंत अडीच लाख रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. त्यासाठी आता नव्याने अर्ज घेणे सुरु आहे.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत लातूर शहरात आतापर्यंत ४ हजार ३९३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार ९८७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर ८१६ घरकुलांचे काम सुरु आहे. ५६४ घरकुलांचे अद्याप काम सुरु झालेले नाही. तर नव्याने ७९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. स्वत:ची जागा आहे पण राहायला घर नाही, अशा व्यक्तींचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पुर्ण होत आहे. ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे.
लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांचे घर देण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी लातूर शहर महानगरपालिकेला २२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही संवर्गातील ज्यांना शहरात स्वत:ची जागा आहे, परंतू, पक्के घर नाही, अशा लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यानुसार लातूर शहर महानगरपालिकाअंतर्गत ५ हजार १९५ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. गरजूंनी या योजनेअंतर्गत अर्ज करावेत, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.