कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यांच्या नावाने धमकी आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप सावंत यांच्यावर करत त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी संबंधित इसमाने फोनद्वारे दिली आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याचा निषेध केला आहे.
गृह विभागाने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले, साधारण १२ वाजता मला धमकीचा फोन आला. ती व्यक्ती शिव्या घालून जातिवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख त्या व्यक्तीने केला आहे. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली.
राज्याच्या गृहमंत्रालयाने यावर कारवाई करावी. त्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील, अशी आशा आहे. संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर ऊठबस आहे. पण अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे, माझे नातेवाईक, सहकारी सक्षम असल्याचे सावंत यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मी कसा बदलू. इतिहासाचे दाखले ब्रिटिश काळापासून आहेत. खोटा इतिहास, घाणेरडा इतिहास सांगावा अशी त्यांची इच्छा आहे. पण खोटा इतिहास आम्ही का सांगू, त्या-त्यावेळी ते मुद्दे खोडून काढले असल्याचे सावंत यांनी सांगितले.
आता आपण हा कॉल केला नसल्याचे सांगितले जात असले तरी, समाज माध्यमांवर त्याचे पुरावे देखील उपलब्ध असल्याचे इंद्रजीत सावंत यांनी नमूद केले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे समजते. त्यामुळे सावंत यांना नेमका कुणी फोन केला, हे लवकरच स्पष्ट होईल.