26.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये १० ठिकाणी अनधिकृत पुतळे

बीडमध्ये १० ठिकाणी अनधिकृत पुतळे

बीड : प्रतिनिधी
महापुरुष, आदर्श व्यक्ती यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असावा, त्यांच्या स्मृतींची आठवण राहावी यासाठी पुतळे उभारले जातात; परंतु त्यासाठी प्रशासन आणि स्थानिक पातळीवरून परवानगी घेणे आवश्यक असते. मागील १३ महिन्यांत कोणीही असे केलेले नाही. उलट अनधिकृतपणे चौक, पुतळे उभा करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. १० ठिकाणी असे प्रकार घडले होते. त्यातील सहा ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अशा संवेदनशील प्रकरणांत बांधकाम विभाग अथवा महसूल प्रशासनाच्या प्रतिनिधीने फिर्याद देणे आवश्यक असते; परंतु पोलिसांनीच पुढाकार घेतला.

सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय काढून पुतळा धोरण ठरवले. यात महापुरुष, आदर्श व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविली. पुतळ्याच्या परवानगीसाठी आलेले प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित राहात असल्याने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर समिती तयार केली.

यात सर्व कागदपत्रे घेऊन परवानगी देण्यास सांगितले; परंतु जिल्ह्यात असे कोणीही करताना दिसत नाही. रात्रीतूनच पुतळा उभारायचा किंवा चौकाला नाव द्यायचे, असे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे दोन समाजांत, गटांत वाद होत आहेत. तसेच अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी असे प्रकार कोणीही करणार नाही, यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच ज्यांनी असे केले आहे, त्यांच्याविरोधात तक्रार देणेही तितकेचे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR