बेळगाव : बस वाहकावरील हल्ल्याप्रकरणी मी पोलिस प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. हा केवळ हा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक वाद असून, त्याला भाषिक वादाचा रंग देण्यात येऊ नये. तसेच यासंदर्भात कोणीही बेळगावमध्ये येऊन आंदोलन करू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या घटनेला कन्नड आणि मराठी भाषिकांमधील वाद म्हणून सादर केले जाऊ नये. अन्यथा त्याचा परिणाम बेळगाव जिल्ह्याच्या विकासावर होईल. हे एक सर्वसामान्य प्रकरण आहे. सदर घटनेमुळे कन्नड आणि मराठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परिणामी बस सेवा बंद झाली आहे. सरकारला आणि बेळगावला त्रास एवढीच त्या घटनेची फलनिष्पत्ती आहे. वारंवार घडणा-या अशा घटनांमुळे बेळगावच्या विकासावर परिणाम होत आहे.
सदर प्रकरणी पोलिसांचे काम तुम्ही करू नका. पोलिसांनी गुन्हे नोंदवून घेतले आहेत, त्यांना त्यांचे काम करू द्या. या पद्धतीच्या घटनांमध्ये कर्नाटकातल्या संघटना आक्रमक झाल्या की महाराष्ट्रातल्या संघटना आक्रमक होतात. या पद्धतीची प्रकरणे हाताळण्यास कर्नाटक व महाराष्ट्राचे पोलिस आणि सरकार सक्षम आहे.
बेळगावमध्ये घडलेल्या घटनेवरून उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून समन्वयाने दोन्ही राज्यांची बससेवा पूर्ववत सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बस वाहकासंदर्भातील प्रकरणात जो कोण दोषी आढळेल त्यावर पोलिस कारवाई करतीलच. पोलिस योग्य ती कारवाई करत असल्यामुळे कर्नाटक रक्षण वेदिके अथवा कोणीही बेळगावमध्ये येऊन आंदोलन करू नये असे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.