24.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeसंपादकीयसाहित्य संमेलनातील धुळवड!

साहित्य संमेलनातील धुळवड!

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले. माणसे खूप चांगली आहेत. त्यांच्यात एकमेकांविषयी आदर आहे. त्यामुळे केवळ राजकारणामुळे माणसात भेदभाव होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली. संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदी राजकारण्यांची उपस्थिती होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि साहित्यिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आतापर्यंतच्या संमेलनांमधून मराठी माणसाला, मराठी भाषेला नेमका काय लाभ झाला असा प्रश्न पडतो. या वेळच्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांची भूमिका मात्र रोखठोक आणि डोळ्यात अंजन घालणारी होती. डॉ. भवाळकर या लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत. त्यांची दृष्टी पुरोगामी आहे.

त्यांनी भाषा व संस्कृती या जाती-धर्माचे भेद मानत नाहीत हे अधोरेखित केले. भाषा ही तोडणारी नव्हे तर जोडणारी आहे असे पंतप्रधानांच्या उपस्थितीत सुनावले. मराठी भाषेला दोन हजार वर्षांची परंपरा आहे. प्राकृत मराठीपासून आजच्या अभिजात मराठीपर्यंत साहित्याचे विविध प्रवाह आले. परंतु हे प्रवाह नदीच्या मुळासारखेच असतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच त्यांनी भाषणात मराठीबद्दल चिंताही व्यक्त केली. कारण अभिजात दर्जा प्राप्त झाला तरी ती व्यवहारात वापरली गेलीच नाही तर ती टिकणार कशी आणि तिचा विकास होणार कसा? हा डॉ. भवाळकर यांनी केलेला प्रश्न योग्यच होता. कारण दरवर्षी शेकडो मराठी शाळा बंद पडत आहेत आणि वर्षातले तीन दिवस मराठीविषयी चिंता व्यक्त केली जाते. परंतु हे संमेलन साहित्यिकांचे की राजकारण्यांचे असा संभ्रम निर्माण झाला. कारण या संमेलनावर राजकारण्यांचे वर्चस्व दिसून आले. यात मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांना अधिक महत्त्व दिले गेल्याचे दिसून आले. राज्य शासनाकडून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि भाषा मंत्र्यांचे फोटो दिसून आले पण संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांचा फोटो नव्हता. साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चा, मुलाखती आणि कविसंमेलन होते पण मुलाखतीतून राजकीय चिखलफेकच करण्यात आली. वास्तविक मराठी भाषा, साहित्य आणि तिच्या संस्कृतीचे वैभव जगासमोर यावे हा संमेलनाचा हेतू असतो. परंतु संमेलन हे सरकारी अनुदानावर होते.

त्यामुळे राजकारणी लोकांना बोलवावे लागते. पूर्वी साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा पैसा नको व राजकारणही नको असे ठामपणे सांगणारे साहित्यिक होते. खरे तर साहित्य महामंडळाने आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे पण तसे होत नाही. आताची संमेलने म्हणजे राजकीय मेळावा होत चालला आहे. साहित्य संमेलन आणि वाद ही अलिकडच्या काळातील प्रथा या संमेलनातही चालू राहिली. हे संमेलनही साहित्यापेक्षा साहित्यबा कारणांनी जास्त गाजले. दिल्लीतील या साहित्य संमेलनातील अनेक चर्चासत्रे आणि परिसंवाद हे साहित्यबा होते असा आक्षेप घेतला गेला. त्यातही राजकीय टीका-टिप्पणी अधिक झाल्याने वादाला तोंड फुटले. यंदाही साहित्य संमेलनात दरवर्षीप्रमाणे निरर्थक वाद उद्भवल्यामुळे साहित्यप्रेमी रसिकांच्या आनंदावर विरजण पडले. अर्थात याची सुरुवात महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सुरू झाल्याचे दिसले. संमेलनाच्या अखेरच्या दिवशी ‘आम्ही असे घडलो’ मुलाखतीच्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या नेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी बेताल वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत असे. या वक्तव्यावरून खळबळ माजली.

स्वत: एकही निवडणूक न लढवता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून फुकट चार वेळा विधान परिषदेची थेट आमदारकी आणि दोन वेळा विधानसभेचे उपसभापतिपद घेणा-या नीलम गो-हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून असे आरोप केल्याने सारे अवाक् झाले. ठाकरे गटाने त्यांच्यावर कठोर टीका केली. भाजपाने सावरायचा प्रयत्न केला तर शिंदे गटाने मौन पाळले. राजकीय स्वार्थापोटी रिपब्लिकन पक्ष सोडून शिवसेना आणि आता शिंदे गट असा प्रवास करत आपली विचारधारा आणि पक्ष यांना सतत तिलांजली देणा-या नीलम गो-हे यांनी इतके हास्यास्पद विधान करावे याचे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. नीलम गो-हे यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाने सणसणीत प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, कुठे आहेत मर्सिडीज, दाखवा ना. हे सगळे गयेगुजरे लोक आहेत. एक महिला म्हणून त्यांचा आदर जरूर आहे. राजकारणात त्यांनी त्यांचे चांगभले केले आहे ते तसेच राहू द्या. आमदार अंबादास दानवे म्हणाले, नीलमताई चार वेळा विधान परिषदेच्या आमदार राहिल्या मग त्यांनी आठ मर्सिडीज दिल्या का? दोन वेळा विधान परिषद उपसभापती राहिलेल्या नीलमताईंनी असे विधान करावे याला नमकहरामी याशिवाय दुसरा शब्द नाही. नीलम गो-हेंविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

गो-हेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. नीलम गो-हेंचे वक्तव्य ही विकृती असल्याचे खा. संजय राऊत म्हणाले. संमेलनात कार्यक्रम ठेवण्यासाठी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना ५० लाख रुपये दिल्याचा आरोप राऊत यांनी केला. नीलम गो-हे यांचे वक्तव्य म्हणजे मूर्खपणा आहे अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले आहे. या आधी गणेश नाईक यांनीही पक्ष सोडला पण पक्ष सोडल्यावर त्यांनी कधीही ठाकरे गटावर टीका केली नाही. आज जे ठाकरेंच्या पुण्याईवर मोठे झाले ते सत्तेच्या मस्तीने आंधळे झाले आहेत असे दिसते. नीलमताईंनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करून आपला सुसंस्कृतपणा व सद्सद्विवेकबुद्धी सत्तेपुढे गहाण ठेवल्याचे दिसून येते. राजकारणामुळेच आज माणसामाणसात भेदाभेद करण्यात येत असल्याची डॉ. तारा भवाळकर यांची खंत खरी असल्याचे जाणवते आहे. डॉ. नीलम गो-हे यांनी असे वक्तव्य करायला नको होते, कारण त्यामुळे मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक होण्याऐवजी राजकीयच झाल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR