जिंतूर : तालुक्यातील पाचेगाव, रेपा, मानधानी, पुंगळा गावातील शेतक-यांनी एकत्र येत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तब्बल १५ किमी भव्य बैलगाडी मोर्चा काढून आरक्षण व इतर मागण्यांचे निवेदन दि. ५ रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसगट कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध आंदोलन होत आहेत.
यामध्ये तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावात साखळी उपोषण चालू आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, रेपा, मानधानी, नागणगाव, आडगाव, वसा, दौडगाव, बोर्डी, भोगाव पुंगळा गावातील शेतक-यांनी एकत्र येत तब्बल १५ किमी बैलांना सजवून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मराठा समाजाला सरसगट कुणबीतुन ओबीसी प्रवगार्तून आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, आरक्षण मागणीच्या आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. आरक्षण प्रश्न लवकर सुटला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान बैलगाडी मोर्चा शहरात येताना पोलिसांकडून अडवण्यात आला होता. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान शहरातील साई मैदानावर बैलगाडी मोर्चाचा समारोप करण्यात आला.