26.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रसिंधुदुर्गातील ९ सेतू सुविधा केंद्रांवर गुजराती कंपनीचा ताबा

सिंधुदुर्गातील ९ सेतू सुविधा केंद्रांवर गुजराती कंपनीचा ताबा

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
महाराष्ट्रात येणा-या कंपन्या गुजरातला पळवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होतो. मात्र आता गुजरातमधील कंपन्या महाराष्ट्रातच घुसखोरी करत येथे उद्योग थाटत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

सिंधुदुर्गमधील नऊ तालुक्यांतील सेतू सुविधा केंद्राचे काम गुजरातमधील कंपनीला देण्यात आल्याचा दावा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील सेतू सुविधा केंद्र चालवण्याचे कंत्राट गुजरातची कंपनी गुजरात इन्फोटेकला देण्यात आले आहे. तीन वर्षांसाठी गुजराती कंपनी सेतू सुविधा केंद्र चालवणार आहे. या वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून सिंधुदुर्गचे सेतू सुविधा केंद्र गुजरातच्या कंपनीच्या ताब्यात गेले आहे. ९ जानेवारी २०२५ पासून ते ८ जानेवारी २०२८ पर्यंत, पुढील तीन वर्षांसाठीचे कंत्राट गुजरात इन्फोटेक या गुजरातच्या कंपनीला देण्यात आले आहे.

यावरून शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा ठाकरे गट विरुद्ध भाजप असा वाद रंगताना दिसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत, असे आरोप विरोधक सातत्याने करत आले आहेत. मात्र दावोस येथे महाराष्ट्रात उद्योग उभारणीचे कोट्यवधींचे करार झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आले.

मात्र स्थानिक पातळीवर बेरोजगार युवकांना संधी मिळेल असे सेतू सुविधा केंद्रांचे कंत्राटही गुजराती कंपनीला देण्यात आले. यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या नऊ केंद्रांचा कारभार आता गुजराती कंपनीकडे असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR