जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच तालुक्यामध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील अनेक महादेव मंदिरामध्ये हर हर महादेवचा गजर एकावयास मिळाला . महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण तालुक्यामध्ये भक्तिमय वातावरण होते. विविध मंदिरामध्ये पूजा पाठ तसेच आरती व पारायण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते .
जळकोट शहरातील श्री महादेव मंदिरामध्ये सकाळी सहा वाजल्यापासूनच भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती . यावेळी महिलांनी महादेवाची भक्तीमय पूजा करत आरतीही केली. शहरातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यासोबतच जळकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या आतनूर येथील महादेव मंदिरातही भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती . यासोबतच गुत्ती येथील महादेव मंदिरामध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी गुत्ती येथील भाविकांनी महादेवाची मनोभावे पूजा केली. तालुक्यातील होकर्णा येथेही महादेव मंदिरामध्ये ग्रामस्थांनी महाशिवरात्री निमित्त महादेवाचे दर्शन घेतले. वांजरवाडा येथेही श्री सोमेश्वर महादेव मंदिरामध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. केकतशिंदगी येथे भाविकांनी मनोभावे श्री महादेवाची पूजा केली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमय वातावरण होते .
जळकोट तालुक्यातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कंधार तालुक्यातील कड्याचा महादेव येथे मंदिरामध्ये जळकोट तालुक्यातील शिवभक्तांनी दर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तालुक्यातील हजारो भाविकांनी कड्याचा महादेव येथे जाऊन श्री महादेवाचे दर्शन घेतले व तेथे पूजा-अर्चा केली . यासोबतच जळकोटपासून जवळ असलेल्या पाखंडेवाडी येथेही महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात शिवचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात
आले होते.