सुरत : गुजरातच्या सुरत येथे कापड बाजारात भीषण आग लागली. गेल्या २४ तासांत दुस-यांदा ही आग लागली. या आगीत लक्षणीय वाढ झाल्याने ही आग मार्केटच्या पाचव्या मजल्यावर पसरली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुरतमधील शिवशक्ती कापड बाजारात भीषण आग लागली. मार्केटमध्ये सुमारे ८०० दुकाने असून, ती सर्व कपड्याची आहेत. त्यामुळे आग वेगाने पसरली आणि जवळपास संपूर्ण इमारतीला आग लागली.
सूरतमध्ये लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा व्हीडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये आग किती प्रमाणात पसरली आहे, हे पाहायला मिळत आहे. अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आणखी पसरण्यापासून रोखले असले तरी या आगीमुळे शिवशक्ती टेक्सटाईल मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या इमारतीला आग लागली तेथे सुमारे ८०० दुकाने असल्याने आग आटोक्यात आणण्याचे हे आव्हान होते.
संपूर्ण परिसर केला रिकामा
या घटनेनंतर सुरतच्या पोलिसांनी सांगितले की, अग्निशमन विभागाच्या पथकांनी शिवशक्ती टेक्सटाईल मार्केटमधील आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी बाधित क्षेत्र रिकामे केले. या आगीत किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवशक्ती मार्केटमध्ये ८०० पेक्षा जास्त कापडाची दुकाने असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपासच्या बाजारपेठांमधील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.