30.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रस्वारगेट प्रकरणाला एसटीची खासगी सुरक्षा कारणीभूत, कदमांकडून पोलिसांची पाठराखण

स्वारगेट प्रकरणाला एसटीची खासगी सुरक्षा कारणीभूत, कदमांकडून पोलिसांची पाठराखण

पुणे : प्रतिनिधी
स्वारगेट डेपोतून फलटणला निघालेल्या तरुणीवर मंगळवारी (ता. २५ फेब्रुवारी) पहाटे अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याला शोधून देणा-यास १ लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा पोलिसांकडून करण्यात आली आहे. परंतु आरोपी अद्यापही फरार आहे. पण येत्या काही तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणाला एसटीची खासगी सुरक्षा कारणीभूत असल्याचे म्हणत मंत्री योगेश कदमांनी पोलिसांची पाठराखण केली आहे.

आज गुरुवारी (ता. २७ फेब्रुवारी) मंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस डेपोतील घटनास्थळाचा आढावा घेतला. यावेळी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार सुद्धा तिथे उपस्थित होते. ज्यानंतर मंत्री कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेबाबत गुप्तता का ठेवण्यात आली? याची माहिती सुद्धा कदम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले की, स्वारगेट अत्याचार प्रकरण हे दुर्दैवी आहे. मात्र घटनेची माहिती लवकर मिळाली असती तर आरोपीला लवकर पकडता आले असते. संभाव्य लोकेशन न मिळवता थेट आरोपीला अटक करण्यात आली असती. लवकर बातमी बाहेर आली असती तर आरोपीला लांब पळून जाता आले नसते. घटना लपवून ठेवण्याचा प्रकार झालेला नाही. मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. जी या केसमध्ये गरजेची होती. आरोपी हा लवकरच पकडला जाईल, असा विश्वास मंत्री कदम यांनी व्यक्त केला आहे.

तसेच, स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी लवकरात लवकर पकडला जाईल. पोलिसांची आठ पथके आरोपीच्या मागावर आहेत. कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा न झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना याबाबत कळून आले नाही. बसच्या आजूबाजूला १० ते १५ लोक होते. मात्र आरडाओरड न झाल्यामुळे आरोपीला क्राईम सुरळितपणे करता आला. एसटी महामंडळाकडून खाजगी सुरक्षा घेण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठक घेत यासंबंधित ते निर्णय घेतील. पोलिसांमार्फत गस्त घालण्यात येत आहे. या प्रकरणावेळी देखील गस्त घालण्यात आली असून यामध्ये पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचे म्हणता येणार नाही. प्रायव्हेट सिक्युरिटी असताना त्यांनी सुरक्षा दिली नाही ही बाब नक्कीच दिसून येत आहे. त्यावर काम करणे आवश्यक आहे, असे यावेळी योगेश कदम यांनी सांगितले.

स्वारगेट आवारामध्ये अवैध धंदे आणि अत्याचाराच्या घटना होत असल्याचे समोर येण्याबाबत माध्यमांनी प्रश्न केला आहे. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, स्वारगेट आगारामध्ये आता ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी पोलिसांनी २०२५ पर्यंत जवळपास ७ हजारांहून अधिक कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. या एका वर्षामध्ये केलेल्या कारवाया आहेत. यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व कारवाया आहेत. त्यामुळे पोलिसांचे दुर्लक्ष आहे असे म्हणता येणार नाही. फक्त गाडीतून नाही तर खाली उतरून प्रत्यक्ष गस्त घातली जात आहे. आरोपीला ट्रॅक केले जात आहे, लवकरच अटक होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR