24.9 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीत सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य

एसटीत सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य

मुंबई : पुणे बसस्थानकात घडलेल्या घटनेची जबाबदारी आम्ही झटकत नाही. शेवटी घटना परिवहन विभागाच्या आवारात घडली आहे. वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे देणे हे आमचे कर्तव्य आहे. पुण्यात घडलेली घटना दुर्दैवी आहे. अशी घटना डेपो किंवा कुठेही घडू नये, असेही सरनाईक म्हणाले.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर २६ वर्षीय तरुणीवर दत्ता गाडे नावाच्या सराईत आरोपीने अत्याचार केला. अत्याचारानंतर पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर झोपलेले सरकार जागे झाले असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत बसस्थानकांवरील सुरक्षा, आयपीएस अधिका-याची नेमणूक, एसआय तंत्रज्ञानाचा वापर यासंबंधित सूचना केल्याची माहिती सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.

प्रताप सरनाईक म्हणाले, ‘‘प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एका आयपीएस अधिका-याची नियुक्ती करण्याचा निर्णय होता. तो झालेला नव्हता. त्याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे. महामंडळाकडे असलेल्या १४,३०० एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

महिला सुरक्षारक्षक वाढवणार
डेपोतील बंद पडलेल्या बसेस, आरटीओच्या गाड्या १५ एप्रिलपर्यंत भंगारात घालण्याचे आदेश दिले आहेत. बसस्थानकावर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. बसस्थानकांना तीन कंपन्यांकडून २७०० सुरक्षारक्षक पुरवले जातात. आता महिला सुरक्षारक्षक वाढवण्यात येणार आहेत. ‘एआय’चा वापर करून बसस्थानकांवर सुधारणा करण्यात येणार आहे. बसस्थानकांच्या सुरक्षेबाबत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

सीसीटीव्ही यंत्रणा चांगली होती
पुण्यातील आरोपी पकडण्यासाठी बसस्थानकातील सीसीटीव्हीची मदत मिळाली. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे स्वारगेट बसस्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा चांगली होती, हे सिद्ध झाले आहे. दुस-या डेपोत सीसीटीव्ही कार्यान्वित नसेल, तर दुरुस्त करण्यात येतील, असे सरनाईक यांनी सांगितले.

बसचा दरवाजा उघडा असल्याची आरोपीला कल्पना
अनेक बसस्थानकावर मी अचानक भेटी दिल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरील २३ सुरक्षारक्षकांना बदलण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीला बसचा दरवाजा उघडा असल्याची कल्पना होती. ही बाब भविष्यात पोलिस तपासात समोर येईल, असे सरनाईक यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR