कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतक-यांचा तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीतही विरोधाचे परिणाम पाहायला मिळाले आहेत. म्हणून बाधित शेतक-यांचा विरोध असेल तर शक्तिपीठला माझाही विरोध कायम आहे, अशी भूमिका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.
महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग होईल, अशी घोषणा केली. त्याच सरकारमधीलच मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापुरातून शक्तिपीठ जाण्याला थेट विरोध केला आहे. यामुळे शक्तिपीठ प्रकरणी सरकारमध्येच भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठला विरोध असल्यानेच विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिसूचना रद्द करून घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारले. त्यावेळी जिल्ह्यातून शक्तिपीठला विरोध आहे, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तिपीठ सर्वांना विश्वासात घेऊनच केले जाईल, असे आश्वासन दिले.