परभणी : तालुक्यातील मटक-हाळा ते आनंदवाडी रस्त्याचे कंत्राटदाराने अर्धवट सोडुन दिलेले काम तात्काळ सुरु करण्यासाठी दि. ९ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देवुन काम सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पत्रानंतर कंत्राटदाराने तात्काळ कामाची सुरुवात केली परंतु आठवडाभर काम केल्यानंतर कंत्राटदाराने परत काम थांबवले आहे.
या बाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वेळोवेळी पाठपुरावा करुनही काम सुरु होत नसल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या कार्यालयात डफली बजाव आंदोलन करण्यात आले. तसेच कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकत्यांनी ठिय्या आंदोलन केले.
अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे व कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी तसेच डफलीच्या आवाजाने कार्यालयात एकच गोंधळ उडाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तात्काळ मोठा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे कार्यकारी अभियंता यांनी तातडीची बैठक घेवुन कंत्राटदाराकडून दि. ३ मार्च पासून कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन घेत त्याची प्रत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगीत करण्यात आले. यानंतर काम थांबल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिला.
या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग वोधने, तालुका प्रमुख उध्दवराव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, ज्ञानेश्वर सोन्ने, संतोष गरुड, सुरेश उत्तमराव, सुरेश पांडुरंग, मुंजाजी सोन्ने, भागवत गरूड, वसंतराव गरुड, हनुमान गरुड, रामप्रसाद गरुड, प्रकाश गरूड, रामेश्वर गरुड, सोपान हारकळ, प्रल्हाद गरुड, भगवान लिजडे, विजय गरुड, गजानन गरुड, कुंडलिक गरुड, लिंबाजी राऊत, माहादु पिटले, राजु गरुड, उध्दव मुंजाजीराव इत्यादी कार्यकर्ते व गावातील शेतकरी उपस्थीत होते.