नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सुप्रीम कोर्टात एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अभय ओका चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. वकिलांनी सुनावणी दरम्यान केलेल्या वर्तणुकीमुळे न्यायमूर्ती अभय ओका यांनी संताप व्यक्त केला. कोर्टरुममध्ये एकाच वेळी अनेक वकिलांनी आपापले युक्तिवाद मांडण्यास सुरुवात केली. हे पाहून न्यायमूर्ती ओका यांनी वकिलांना शांत राहून एक एक करुन युक्तीवाद करण्यास सांगितले. मात्र वकिलांनी न्यायमूर्तींचेही ऐकले नाही आणि गोंधळ घालणे चालूच ठेवले. हे पाहून न्यायमूर्ती ओका वकिलांवर संतापले.
न्यायमूर्ती अभय एस. ओका यांनी असा शिस्तीचा अभाव पाहून मी कंटाळलो आहे, असे म्हटले. न्यायालयात दररोज शिस्तीचा अभाव दिसून येत आहे. आम्ही वकिलांना विचारत राहतो की ते कोणासाठी हजर आहेत, पण वकील काहीच उत्तर देत नाहीत, अशा शब्दात न्यायमूर्ती अभय एस. ओका यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
न्यायमूर्ती एस. ओका वकिलांवर संतापल्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. याआधीही अनेक प्रकरणांमध्ये वकिलांकडून खोटी माहिती मिळत असल्याबद्दल न्यायमूर्ती एस. ओका यांनी नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये न्यायमूर्ती एस. ओका आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, अशी अनेक प्रकरणे आमच्यासमोर आली आहेत ज्यात खोटे युक्तिवाद करण्यात आले आहेत.
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही या प्रकारावर भाष्य केलं. या गोंधळात अनेक हस्तक्षेप करणारे लोक आहेत, जे केस कोर्टाबाहेर फेकण्याचा प्रयत्न करत आहेत. खटला बंद करणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे.