मुंबई : वृत्तसंस्था
सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू आहे. या मोठ्या मालिकेच्या मध्यावर अचानक एक वाईट बातमी समोर आली आहे. क्रिकेट विश्वावर अचानक शोककळा पसरली आहे. याचे कारण असे की जागतिक क्रिकेटमधील एका दिग्गज क्रिकेटपटूचे आकस्मिक निधन झाले आहे. या क्रिकेटपटूच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही खूप मोठा धक्का बसला आहे. रॉन ड्रेपर या सर्वांत वयस्क कसोटी क्रिकेटपटूंचे शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेतील गेबर्हा येथे निधन झाले.
सर्वांत वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे रॉन ड्रेपर यांचे वयाच्या ९८ वर्षे ६३ दिवसांनी निधन झाले आहे. रॉन ड्रेपर हे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते. या करिअरमध्ये त्यांनी काही विकेट्सही घेतल्या आहेत. रॉन ड्रेपर यांनी १९५० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
रॉन ड्रेपरच्या आधी, नॉर्मन गॉर्डन आणि जॉन वॅटकिन्स हे दोन्ही खेळाडू सर्वांत जुने कसोटी क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिकेचे होते. रॉन ड्रेपर यांनी १९४५ मध्ये त्याच्या १९ व्या वाढदिवसाला पूर्व प्रांतासाठी तिस-या क्रमांकावर फलंदाजी करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना शतक केले. रॉन ड्रेपर यांनी १९४६-४७ मध्ये पूर्व प्रांतासाठी यष्टिरक्षक म्हणूनही भूमिका बजावली, ही भूमिका त्यांनी त्याच्या कारकीर्दीत अनियमितपणे बजावली.