पॅरिस : वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसचा सामना करून रुग्णालयातून घरी परतलेल्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नवीन रिसर्चनुसार, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागलेल्या लोकांना बरे झाल्यानंतर अडीच वर्षांपर्यंत मृत्यूचा आणि गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असतो. ‘इन्फेक्टियस डिसीजेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्समध्ये हे उघड झाले आहे, ज्यामध्ये फ्रान्समधील ६४,००० लोकांवर संशोधन करण्यात आले.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची नीट काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. पॅरिसमधील बिचॅट हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ञ आणि प्रमुख संशोधक डॉ. सारा टुबियाना म्हणाल्या की, हा रिसर्च कोविड-१९ चे दूरगामी परिणाम अधोरेखित करतो. आमच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना अनेक महिने आणि अनेक वर्षे गंभीर आरोग्यविषयक धोक्यांना तोंड द्यावे लागू शकते.
या संशोधनात जानेवारी ते ऑगस्ट २०२० दरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या ६३,९९० लोकांचा समावेश होता, ज्यांचे सरासरी वय ६५ वर्षे होते आणि ५३.१% पुरुष होते. त्यांची तुलना ३,१९,८९१ सामान्य लोकांशी करण्यात आली जे वय, लिंग यामध्ये समान होते, परंतु कोविडसाठी रुग्णालयात दाखल झाले नव्हते. निकालांवरून असे दिसून आले की, ठीक झालेल्या कोविड रुग्णांमध्ये मृत्युदर हा सामान्य लोकसंख्येपेक्षा खूपच जास्त होता.
रुग्णांमध्ये आढळलेल्या समस्या
या रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचा, न्यूरोलॉजिकल, मानसिक, हृदय आणि श्वसनाच्या समस्यांचा धोका वाढल्याचे आढळून आले. हा धोका पुरुष आणि महिलांसाठी सारखाच होता, मानसिक समस्या वगळता, जिथे महिलांना जास्त धोका होता. ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अवयवांशी संबंधित आजारांसाठी पुन्हा रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाणही जास्त होते. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर ३० महिन्यांपर्यंत न्यूरोलॉजिकल, श्वसन, किडनी निकामी होणे आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका कायम राहतो, असेही रिसर्चमधून समोर आले आहे.