नाशिक : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेप्रकरणी स्थगिती मिळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. तर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला होता. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षे प्रकरणी आज निकाल येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता या प्रकरणात पुढील सुनावणी ५ मार्च रोजी होणार आहे.
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व् ू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती.
गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. यानंतर शिक्षेला स्थगिती मिळावी या अर्जावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला.
पुढील सुनावणी ५ मार्चला होणार
कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी अंजली दिघोळे यांनी याआधी हस्तक्षेप अर्ज दाखल होता. यानंतर शरद शिंदे यांनी देखील हस्तक्षेप अर्ज दाखल केला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या प्रकरणी दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतले. हस्तक्षेप याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता या प्रकरणी ५ मार्च रोजी सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत ज्यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास वेळ देण्यात आला आहे.